२०१८-०३-०२

सरसगडची सुरस सहल

सरसगडाच्या ९६ पायरी जिन्याच्या पायथ्याशी आम्ही अडलो होतो. छे! हा तर अवघड रॉक पॅच होता. हा काही आपल्याला जमणार नाही. चला परत. कारण पालीत राहणार्‍या एका अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेलेच होते की साठीच्या वरील लोकांसाठी सरसगड काही सोपा नाही. त्यांनी तर जाऊच नये तिथे.


तरीही आम्ही आलेलो होतो. ऊन मरणाचे होते. खडक तापलेले. बाराचा सुमार. इथवर येईस्तोवरच दमछाक झालेली. नाही जमणार..... असे वाटत असतांनाच उमेद पुन्हा जागी झाली. तो प्रस्तर तर चढून गेलोच. शिवाय बालेकिल्ल्यावरील केदारेश्वर मंदिरापर्यंत आता आम्ही पोहोचलेलो होतो. अवघड होतेच. पण आता आम्हाला जमलेले होते. प्रचंड थकवा होता. आणि आनंदही!



दुरून डोंगर साजरे म्हणतात. मात्र पाली गावातून आम्ही सरसगडाच्या माचीवर जाऊन पोहोचलो तरी तो साजराच दिसत होता. नैसर्गिक आवळ्या-जावळ्या बुरुजांच्या फटीतून कोरलेली वाट असणारा. सममित. कारण हा फोटो आम्ही गडाच्या दक्षिणेकडे असतांनाचा आहे. समजा आम्ही उत्तरेकडे असतो तरीही असेच दृश्य दिसेल इतका तो सममित आहे. फरक केवळ एवढाच की फोटोत उजव्या हाताला दिसणारा तीन कवड्यांचा किल्ला तेव्हा डाव्या बाजूला दिसेल. महाजालावर तसेही फोटो उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठून चढाई करत आहात हे सांगितल्याखेरीज उजव्या-डाव्या असल्या वर्णनांना काडीचेही मोल नाही. एका व्हिडिओत तर राईट इज राईट असा राईट सल्ला दिलेला आहे. मात्र ते ह्याच दक्षिणद्वारातून प्रवेश करत आहेत, हे लक्षात घेतले नाही तर फसगत होऊ शकते. बालेकिल्ल्याची चढाई केवळ उत्तर दरवाज्यालगतच्या मुरमाड उभ्या चढाईनेच साध्य आहे हे मात्र पक्के. तिथे मंदिराकडेचा फलक हे दिशादिग्दर्शनाचे काम व्यवस्थित करत आहे.



दोन्ही बुरुजांमधला ९६ पायरी जिना गाठायचा तर वरच्या चित्रातल्या उतरणीवर पोहोचायचे आहे खरं तर. उजवीकडील चित्रात कोल्हटकर (पांढरा रुमाल) पोहोचले आहेत तिथे. मी (सेल्फी दिसतोय ना!) उभा आहे त्या ठिकाणाहून माझ्या उजव्या कडेच्या दगडी धारेने वर चढायचे आहे. तेही तसं म्हटल तर सोपेच आहे. मात्र मी उभा आहे तिथे पोहोचायला डावीकडल्या चित्रात महाजन (तांबडी टोपी. ही पुढे परतत असतांना कुठे पडली ते समजलेच नाही.) मांडी घालून बसलेले आहेत त्या कातळावरून चढायचे आहे. हे प्रस्तरारोहण काहिसे अवघड आहे. दगडात खाचा कोरल्या आहेत खर्‍या पण तोल सांभाळत त्यांवर नेमकी पावले टाकत एवढा प्रखर चढ चढणे सोपे नाही. खरा कस इथेच लागला. मात्र थोड्या प्रयत्नांनी आम्ही तिघेही ही परीक्षा उत्तमरीत्या पार झालो आणि ९६ पायर्‍यांच्या जिन्याच्या तळाशी पोहोचलो.



पायर्‍या तुटल्याने पाणप्रवाहाच्या प्रपात मार्गातून चढाई करावी लागते की काय अशी सार्थ भीती वाटू लागली. मध्यंतरी रोडावला होता खचला होता तरीही सुदैवाने वरपर्यंत जिना शाबूत होता. मग त्या ९६ पायर्‍यांच्या जिन्याची चढाई सुरू झाली. ऊन माग सोडत नव्हते. पायर्‍यांची उंची दीड-दीड दोन-दोन फुटांची होती. तापल्या कातळाचे चटके बसत असल्याने फार काळ बसून विश्रांती घेणेही शक्य नव्हते. हाश्श हुश्श करत त्या ९६ पायर्‍यांच्या जिन्याचा माथा गाठला. इथे पहारेकर्‍याची ओवरी मात्र मस्तपैकी थंडगार होती. तिचे तपशील समजून घेत मग तिथे बरीच विश्रांती घेतली.



इथेच डाव्या बुरूजाच्या जिन्यालगतच्या आतील दगडी भिंतीत कोरलेली एक लक्षवेधी गुहा आहे. सुमारे चार फूट चौरस व सुमारे बारा फूट खोलीची गुहा. तिच्या टोकाला जमिनीलगत तीन फूट चौरस व सुमारे सहा फूट खोलीची आतली गुहा आहे. पुढे तिच्याही आत जमिनीलगत सुमारे अडीच फूट चौरस व सुमारे सहा फूट खोलीची एक आणखी गुहा दिसते. तिच्या आत काहीसा डाव्या बाजूला जमिनीवर आंघोळीच्या दगडासारखा एक चौरस सुमारे सहा इंच उंचीचा दगड दिसतो. ही सर्वच गुहा सूर्याच्या प्रकाशाने पूर्ण उजळलेली दिसत होती. मात्र आत जाण्याचे साहस आम्ही केले नाही. एकतर सरळ उभ्याने आत जाता येईल अशी तिची उंची नव्हती. दुसरे म्हणजे एखादे जंगली श्वापद गारव्याला अंतर्भागात पडून असेल तर आपल्या आवाजाने ते उठेल. बाहेर येईल. मग आपल्याला धड पळताही येऊ नये अशी अवघड अपुरी जागा गुहेच्या बाहेर आहे. आत कधीकाळी पदभ्रमणकर्त्यांनी निवास केला असावा, स्वयंपाक केला असावा, अशी स्पष्ट चिन्हे दिसत होती. छतावर काजळी धरलेली दिसत होती.



हल्ली आपल्याला जायचे असेल त्या स्थळाची माहिती महाजालावर आणि नकाशा गुगलवर मिळतो. सरसगडाबाबत जी माहिती महाजालावर उपलब्ध झाली त्यानुसार आमचे असे प्रामाणिक मत झाले की एकदा का ९६ पायर्‍यांचा जिना चढून वर गेले की गडावर फिरायला रान मोकळे. प्रत्यक्षात ९६ पायर्‍यांचा जिना हा एकच काय तो चढ अस्तित्वात नसून तितक्याच उंचीचे अनेक चढ तटावरून पायर्‍यांनी तटालगतच्या चिंचोळ्या जागांतून बालेकिल्ल्यावरच्या मुरमाड खड्या चढाईतून आपल्यासमोर उभे ठाकत असतात. तेही चढावेच लागतात. मात्र बहुधा तरूण उत्साही गिर्यारोहकच असल्या मजकुराचे लेखक असल्याने ज्या नोंदी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांतपाली गावातून माचीवर चढायला एक तास आणि तिथून केदारेश्वर मंदिरात पोहोचायला एक तास लागतो असेच वर्णन सर्वसामान्यपणे दिसून येते. आम्ही तिघेही साठी पार केलेले असल्याने आम्हाला मात्र पाली गावातून केदारेश्वरास पोहोचायला तब्बल पावणेपाच तास लागले ही वस्तुस्थिती आहे. अर्थात त्यास अनेक कारणे आहेत. ती वर्णनाच्या ओघात पुढे येणारच आहेत. नकाशाबाबतचा भ्रमही माचीवर चढताच आकाशात विरून गेला. मग सोबती एकच राहिला. तो म्हणजे डोंबिवलीच्या गिर्यारोहक तरूणांनी निर्मिलेल्या संकेतस्थळावरचा काळाच्या ओघात परखून निघालेला नकाशा. तो मात्र हुबेहुब खरा असल्याचे उमजून आले. गुगल फिट उपायोजनाचे आधारे आम्ही जवळपास तशाच नकाशाबरहुकूम चालून गेल्याची नोंद झाली. आणि महाजालावर पाली ते केदारेश्वर सांगितले गेलेले १.७ किलोमीटरचे अंतर प्रत्यक्षात आम्ही चालून गेलो तेव्हा ३.७ किलोमीटर भरले. 



चौकीदाराच्या देवडीतून बाहेर पडून आम्ही जरा वर आलो तेव्हा बालेकिल्ला नजरेसमोर होता. बालेकिल्ल्यावर चढायला गडाच्या पाठीमागूनच जावे लागेल ह्याची आम्हाला जाणीव होती. ट्रेक्षितिजच्या नकाशानुसार त्याच्या दोन्ही दिशांनी पाठीमागे जायला वाट होती. मात्र त्या एक प्रतलीय नकाशावर उंचीचे स्तर दाखवलेले नसल्याने आम्ही डावी वाट धरली. वस्तुतः इतरांनी राईट इज राईटचा सल्ला दिलेला होता. तो दुर्लक्षून आम्ही डावी वाट (प्रदक्षिणा) चालू लागलो. कोल्हटकर आम्हा तिघांतही फार चपळ. त्यांना वाटांचा शोध लावण्याचा अपार हुरूप आणि ऊर्जाही आहे. ते समोर गेले. एका ठिकाणी अडले. इथून पुढे रस्ताच खुंटला असल्याचे आणि दगडाची अनुल्लंघनीय भिंत समोर उभी ठाकल्याचे शुभवर्तमान त्यांनी घोषित केले. इथवर आम्ही साधारणतः गडाच्या पश्चिमेला पोहोचलो होतो. मग पाठी वळण्याचा निर्णय झाला. बालेकिल्ल्याला अगदी खेटून असलेल्या आडव्या चिंचोळ्या वाटेवरून आम्ही हळूहळू पुन्हा देवडीवरच्या पूर्वपदाला प्राप्त झालो. अंदाजे एक किलोमीटर अंतर चालून पुन्हा आम्ही तिथेच पोहोचलो होतो.



मग उजवी वाट धरून पुढे निघालो. चढ प्रखर होता. मुरमाड जमिनीवरून एवढा प्रखर चढ अवघड ठरला असता. म्हणून किंचित दूरवरून असली तरी तटावरील पायर्‍यांची वाट पत्करली. पूर्वेला म्हणजे उजव्या क्षितिजावर तीन कवडीचा किल्ला उदयमान झाला. तटावरच बसून त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्वचित्रे नोंदवून घेतली.



प्रथम लागला औदुंबर हौद. मग ऐनाचा हौद. मग अनुक्रमे निवासस्थान, धान्यकोठार पाण्याची टाकी लागत गेली. तटावर बाहेरच्या बाजूस प्रचंड वाढलेल्या वृक्षांनी तटाच्या आतल्या बाजूस अशी काही मुळे रोवली होती की आम्हाला तटावर अनेक सापच चढत आहेत की काय असे भासले. एक सापाची कातही मिळाली. किल्ला भटकत असतांना सापाची कात मिळाली नाही तर त्या भटकंतीस परिपूर्णताच येत नाही. मग एक प्रवेशद्वार लागले. हाच बहुधा उत्तर दरवाजा असावा. त्याच्या किंचित बाहेरही जाऊन पाहिले. पण ९६ पायर्‍यांच्या तोडीचा जिना आसपास दिसला नाही. एक पत्थरी उच्चासन मिळाले. मी लगेचच ते ग्रहण करून त्यावरचा अधिकार नोंदवला. नंतर काही बांधकामे दिसली व मंदिराकडे ही पाटी दिसली. सुरूवातीस उलट्या दिशेने मारलेला फेरा ह्या स्थानाच्या आसपासच खुंटला असावा. इथे मात्र आम्ही मुरमाड तीव्र चढावरून खडकांचा आधार शोधत बालेकिल्ला चढू लागल्याने आता माथ्यावर पोहोचेपर्यंतचे फोटो नाहीत. चढतांनाची सुरूवात गडाच्या पश्चिमेकडून होती. अंबा नदी सन्मुख होती. मात्र चढून वर गेल्यावर पीरासमोरून पार होत असतांना पूर्वेकडची बाजू दिसत होती. तिथून तीन कवडीचा किल्ला नखशिखान्त नजरेत भरला.



गडाच्या सर्वोच्च शिखरावर पीर आहे. पीराच्या समोरच्या बाजूस पूर्व दिशा आहे. इकडेच तीन कवडीचा किल्ला नखशिखांत दिसू शकतो. पीरावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस केदारेश्वराचे मंदिर दिसते. वारा पडलेला असला तरी मंदिरानजीकचा भव्य केशरी ध्वज डौलाने फडकतांना दिसतो. शेजारी मखमली तलाव आहे. कोल्हटकरांनी तिथून भरून आनलेल्या दोन कॅन पाण्यात आम्ही हातपाय तोंडे धुवून ताजे झालो. थंडगार पाण्याचा स्पर्श उल्हसित करत होता. प्रचंड थकवा असूनही शिखर सर केल्याचा आनंदही गगनात मावत नव्हता. केदारेश्वरास नमस्कार करून आम्ही शिवमहिम्न म्हटले. मग जेवायला बसलो. इथपर्यंत आमच्या व्यतिरिक्त गडावर काळे कुत्रेही फिरकलेले नव्हते. बालेकिल्ला उतरतांना मात्र आठ-दहा मुले वर चढून येतांना दिसली. खालच्या खेळ-शिबिरात भाग घेणारे ते खेळाडू होते. फावल्या वेळात गड बघायला आलेले. आम्ही उतरून गावात पोहोचण्यापूर्वीच ते बालेकिल्ला चढून, उतरून आम्हाला पार करून गावातही पोहोचले होते. 

 महाजनांचा शिथिलीकरणाचा अपार अभ्यास आहे. त्यांनी जमिनीवर उताणे पडून कमीतकमी वेळात जास्तीतजास्त ताजेतवाने होण्याकरताचे शिथिलीकरण सुरू केले. आम्हालाही शिकवले. चढाकरता दोन ऐवजी पाच तास लागल्याने हाताशी वेळ अपुरा होता. सुखरूप उतरण्याचे अभियान मग आम्ही जवळपास लगोलगच म्हणजे दुपारी दोनचे सुमारास हाती घेतले.



बल्लाळेश्वर देवालयाच्या वाहनतळापासून सरसगडावरील शिवमंदिरापर्यंतच्या वाटचालीत आणि मग तिथेच संध्याकाळी सुमारे पाच वाजता परतलो तोपर्यंत गुगल फिट उपायोजनानुसार केली गेलेली प्रवासाची नोंद पुढीलप्रमाणे होती.

१. एकूण ०८१५ ते १७०० लागलेला वेळः  ८ तास ४५ मिनिटे
२. एकूण चालून गेलेले अंतरः                 ७.४ कि.मी.
३. एकूण चढून उतरलेली उंचीः              २८० मीटर
४. एकूण उचललेली पावलेः                   १२,००० (अंदाजे)
५. एकूण खर्चलेली माणशी ऊर्जाः           २,५०० कॅलरी

गडाच्या डावीकडून घातलेल्या सुमारे ५०० मीटर लांबीच्या असफल वेढ्यापायी सुमारे १ कि.मी. अंतर अतिरिक्त चालावे लागले व त्यात सुमारे वीस मिनिटे वेळ खर्ची पडला होता. सरसगडाची सुरस सहल संतोषजनकरीत्या संपन्न झाली होती. तत्पश्चात हातपाय तोंडे धुवून बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. चक्रधारी कोल्हटकरांनी दमवणारी सहल पूर्ण झाल्यावरही डोंबिवलीपर्यंत यशस्वी सारथ्य करून आम्हाला घरी पावते केले. आम्हा तिघांकरताही ही सहल संस्मरणीय तर झालीच पण परस्परांप्रतीची स्नेहभावना बळकट सशक्त करणारी ठरली. प्रवासाअखेरीस आम्ही पालीतील त्या अनुभवी माणसाशी शतप्रतिशत सहमत झालो की साठी पार केलेल्या सर्वसामान्य माणसांनी सहजी सर करावा असा गड सरसगड नाही! आम्ही सर केला ती गोष्ट निराळी. म्हणूनच तर सुरस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: