२०१४-१०-०२

कानानी बहिरा मुका परी नाही

पुणे
पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन
Published: Thursday, October 2, 2014

'निसर्गराजा ऐक सांगतो', 'कोण होतीस तू काय झालीस तू' या लोकप्रिय गीतांसह 'कुदरत' चित्रपटाच्या शीर्षक गीतामुळे रसिकांच्या मनात घर करून राहिलेले प्रसिद्ध पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ (वय ६७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रात्री दीडच्या सुमारास मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


पं. सदाशिवबुवा जाधव यांच्याकडून चंद्रशेखर गाडगीळ यांनी किराणा घराण्याच्या गायकीची तालीम घेतली. ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या गायन कलेचा श्रीगणेशा केला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम आपल्या गायन कलेने गाजविले. 'लागा चुनरीमें दाग' हे मन्ना डे यांचे लोकप्रिय गीत गाडगीळ समरसून गात असत. या गाण्यानेच त्यांना 'ब्रेक' दिला. गायिका रश्मी यांच्यासमवेत त्यांनी 'रश्मी ऑर्केस्ट्रा'ची स्थापना केली. 'मेलडी मेकर्स' या ऑर्केस्ट्राचे ते हुकमी गायक होते. एका कार्यक्रमाला उपस्थित असलेले संगीतकार राम कदम यांनी गाडगीळ यांचा आवाज ऐकून त्यांना चित्रपटासाठी पाश्र्वगायनाची संधी दिली. व्ही. शांताराम यांच्या 'झुंज' चित्रपटासाठी त्यांनी उषा मंगेशकर यांच्यासमवेत गायिलेली 'निसर्गराजा ऐक सांगतो' आणि 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही गीते लोकप्रिय झाली. 'अरे कोंडला कोंडला देव', 'अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत', 'अजून आठवे ती रात्र पावसाळी' ही गीते रसिकांच्या स्मरणात आहेत.

--------------

लोकसत्तामध्ये हे वृत्त वाचले आणि माझ्या मनात आठवण झाली ती त्यांच्या एका अत्यंत समर्पक गीताची. त्याचे शब्द  कुणी लिहीले आहेत माहीत नाही. मात्र गायलेले चंद्रशेखर ह्यांनी आहेत. सह्याद्री वाहिनीवर हे गीत लागत असे तेव्हा, वस्तुस्थितीचे एवढे यथातथ्य निरूपण, अत्यंत आर्जवी आवाजात, वर्तमान समाजाला नीट समजावून सांगणारे स्वर चंद्रशेखर ह्यांचे आहेत हे कळल्यापासून मला त्यांच्याविषयी फारच आदर वाटू लागला होता. त्यांची इतर कारकीर्द लोकसत्ताने दिल्यानुसार सजलेली आहेच. मात्र केवळ हे एकच गीत ते गायले असते तरीही मी त्यांना मोठेच मानले असते. ते गीत आहे “कानानं बहिरा, मुका परी नाही”. 

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

------------------

कानानी बहिरा मुका परी नाही ।
शिकविता भाषा बोले कसा पाही ॥ धृ ॥

बिघाड हो त्याच्या केवळ कानात ।
वाचा इंद्रियांत दोष मुळी नाही ॥
शब्द नाही कानी, कशी यावी भाषा ।
मुका नसोनीही गप्प सदा राही ॥ १ ॥

जन सकलांनो सत्य हेच जाणा ।
मुक्याला बोलाया शिकवोनी पाही ॥
बालपणी हेरा त्वरित श्रवणदोष ।
श्रवणयंत्र देता शब्द येई कानी ॥ २ ॥

खूप खूप बोला कर्णबधीरांशी ।
बोलाया कसा तो शिके लवलाही ॥
घटक समाजाचा घडवा समर्थ ।
सौख्य तया द्या हो जोडा ही पुण्याई ॥ ३ ॥

गायकः चंद्रशेखर गाडगीळ, संगीत: कमलेश जाधव, अल्बमः रंगला भजनांत पांडुरंग
इथे हे गाणे ऐकता येईलः


.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: