माझे अधोभारणीय लेखन

२०१०-११-३०

दंतकथा

एक जमाना होता. जेव्हा दात दुखायला लागला की उपटून टाकत. माझे बहुतांशी दात त्याच जमान्यात शहीद झाले. जे उरले, त्यांचे दुखणे नव्या जमान्यातले होते. त्याचे उपचारही नव्या जमान्याच्या इतमामाने झाले. मात्र त्यापूर्वी दात दुखायला लागल्यापासून तर उपटून टाकेपर्यंत अक्षरशः जीवनच दुःखमय होत असे. त्या दिवसातले दुःखनिवारण एक दंतवैद्यच काय तो करू शके. (खरे तर ते काम आजही दंतवैद्यच करत असतो.) मात्र तोही वेळीच मिळेल तर मग दुःख ते कशाला उरेल? तर ही आहे त्याच काळातली कथा. एक सर्वसामान्य दंतकथा!

दंतकथा

दातांचे अवघे दुःख, संपूनी होईल सुख, का कधी? ।
ते घडून, दुःख संपून, आठवण नुसती राहिली ॥ १ ॥

ती सारी दंत कहाणी, शब्दरूप करून पुराणी, राखिली ।
कधी कुणास ऐशी प्रचिती, न येवो म्हणुनी मी ती, सांगतो ॥ २ ॥

दातवर्ण मोतीय झाला, कवळीही मौक्तिकमाला, तरी का नको ।
मऊ सरस सेवने करता, कसूर निगेतही घडता, व्हावे कसे ॥ ३ ॥

रसपूर्ण जेवणे करता, कुचकामी ठरती दाढा, शेवटल्या ।
अन् तसेच काही दांत, वरचेही ठरती बाद, आपोआप ॥ ४ ॥

त्यांवरती चढुनी लेप, रसाचे थेट, कवच पोखरती ।
चहा, फळांचे रस, सार अन् सुपे, दातांच्या भिंती क्षरिती ॥ ५ ॥

माझेही असेच झाले, किडल्या दाढा, अन् दांतही वरचे काही, भंगले ।
प्रतिदिनी चहाची पुटे, चिकट बिस्किटे, चघळून सर्वही दांत, खंगले ॥ ६ ॥

मग दुखता त्यातील एक, कळ उरांत नुरली मूक, करी अस्वस्थ ।
दंतवैद्य बघता सगळे, एकजात मजला कळले, होते व्यस्त ॥ ७ ॥

वेदना घरी मी नेता, निस्तेज म्लान प्रतिबिंब, दाखवी आरसा ।
व्यस्तताच त्यांची ठरते, आरोग्यस्थितीचा, प्रत्ययी आरसा ॥ ८॥

पण ठरली पुढली वेळ, कंठवे न मधला काळ, धरिता धीर ।
मग लवंग, कापूर, मंजन लावून विको, कंठले दिवस ॥ ९ ॥

शेवटास तो दिन आला, दंतवैद्य करता झाला, शल्यचिकित्सा।
अलगद देऊन भूल, घेऊनी शस्त्रे, दाताशी झुंजू निघाला ॥ १० ॥

मजबूत एवढा दांत, कीडीने दैववशात, खुडावा लागे ।
ह्या रंजीस येऊनी माझे, सर्वथैव व्याकुळ झाले, अंतर ॥ ११ ॥

उपटता शर्थीने दांत, कवळीचे सोडुनी नातं, तो ढळला ।
तो निघता तेथून दांत, सर्वही विषाक्त रक्त, ओघळले ॥ १२ ॥

ते साठ उत्तरी दुःख, पाच उत्तरी सरले, शल्यक्रियेने ।
मम कृतज्ञतेची साक्ष, वैद्या मी तुजला देत, स्मरत कौशल्या ॥ १३ ॥

नरेंद्र गोळे २००३
.

२०१०-११-२१

ब्लॉग माझा-३ स्पर्धेचा निकाल

.
मला प्रमोद देव यांचा दूरध्वनी आला की उल्लेखनीय अनुदिन्यांत माझ्या अनुदिनीचाही समावेश आहे, तेव्हा खूप आनंद झाला. मग, आयोजकांचे पत्र वाचले. त्याचा मजकूर, त्वरित संदर्भाखातर खाली देत आहे.

प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धक,

‘स्टार माझा’चं स्लोगन आहे-‘नव्या मराठी माणसाचं, नवं न्यूज चॅनल’. जगभरात पसरलेल्या याच मराठी मंडळींसाठी आम्ही ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा सुरू केली. हे या स्पर्धेचं तिसरं वर्ष. तुम्हीही भरभरून प्रतिसाद दिलात. यंदा तर कतार ते कल्याण, इटली ते इंदापूर आणि न्यू यॉर्क ते नागपूर इथून मराठी ब्लॉगर्सनी प्रवेशिका पाठवल्या. विषयाची रेंजही अशीच वैविध्यपूर्ण. महाभारत, भटकंती, खवैयेगिरी, वाचन, कविता, सामाजिक, राजकीय, आयटी....इ. आपले परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनीही उत्तम ब्लॉग निवडले. या दर्जेदार ब्लॉग्जची यादी आम्ही सहर्ष जाहीर करत आहोत. वस्तुत: तीन विजेते आणि दहा उत्तेजनार्थ ब्लॉगर्स जाहीर करण्याचं ठरलं असताना, इतके चांगले ब्लॉग्ज तुम्ही दिलेत की आम्ही सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले.

ज्यांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही, त्यांचेही ब्लॉग्ज चांगलेच आहेत. पण, शेवटी परीक्षकांनाही निवडण्याची अवघड कामगिरी पार पाडायची असते. पुन्हा एकदा सर्व ब्लॉगर्सचे या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन, विजेत्यांचं कौतुक आणि ब्लॉगच्या माध्यमातून अशाच प्रकारे मराठीचे वैश्विक पातळीवर संवर्धन आणि प्रसारण करण्यासाठी शुभेच्छा.....

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in/
२. प्रभाकर फडणीस http://www.mymahabharat.blogspot.com/
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे http://www.sahajach.wordpress.com/

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com/
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com/
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com/
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com/
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com/
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड http://www.shabd-pat.blogspot.com/
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com/
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com/
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com/
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com/
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com/
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://myurmee.blogspot.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com/
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com/
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com/
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com/
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

--------------------------------------------------------------------------

मग अर्थातच, मला झालेला आनंद व्यक्त करण्याकरता आणि संबंधितांचे अभिनंदन करण्याकरता मी ही नोंद लिहायला घेतली.

मराठी साहित्यास अजिबात अनोळखी वाटणार्‍या, मात्र खर्‍याखुर्‍या जीवनातील अनुभवी, माहितगार आणि चोखंदळ मराठी रसिकांचे लेखन, जालनिशींच्या रूपात उदयमान होत आहे. त्यासोबतच या माध्यमावर प्रभुत्व असणार्‍या, त्या माध्यमातच व्यवसाय म्हणून पूर्णवेळ कार्यरत असणार्‍या मराठी सुहृदांनाही अभिव्यक्तीची ही अमोल संधी सहजच उपलब्ध झालेली आहे.

ज्या प्रमाणात हे नवनवोन्मेषशाली साहित्य निर्माण होते आहे त्याच्या आवाक्याची सर्वसामान्य पारंपारिक वाचकांस पुसटशीच कल्पना आहे. अशा साहित्यातील कस, वैविध्य आणि रंजन किती अपार आहे, हे जालावर अविरत वावरणार्‍यांना देखील पुरेसे ज्ञात नाही. मग सामान्य पारंपारिक (मुद्रित माध्यमांच्या) वाचकांस ते कसे आकळावे? ह्या अशक्यकोटीतील साध्यास गवसणी घालण्याचा, “स्टार माझा”ची ही स्पर्धा हा एक प्रभावी प्रयास आहे. त्याखातर त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! आपला हा प्रयास महाजालावरील मराठीच्या इतिहासात एक नवे पर्व उघडणार आहे.

मला जाणीव आहे की अशा साहित्यातील काही जालनिशांची निवड करून त्या लोकांपुढे अभिप्रायार्थ आणणे किती अवघड कामगिरी आहे. असंख्य स्पर्धक उमेदवारांच्या अनुदिन्यांचे परिपूर्ण वाचन करणेही केवळ अशक्यप्राय काम आहे. आपण वापरलेले निकष, परीक्षकसंख्या, वाचनाची खोली यांची मला कल्पना नाही. तरीही हजारोंच्या संख्येतील जालनिशांचे मंथन करून, जे नवनीत वर आणले आहेत त्याचा मी आदर करतो. ते नवनीत, जालनिशींच्या होतकरू वाचकांस सुरस वाटेल यात मुळीच संशय नाही. त्यामुळे पारंपारिक वाचकांसही जालावरील अपार नवसाहित्याचा शोध लागेल.

माझी अनुदिनी आपण उल्लेखनीय ठरवलीत ह्याखातर आपणांस हार्दिक धन्यवाद! इतर सर्व उल्लेखनीय ठरलेल्या उमेदवार-अनुदिन्यांच्या लेखकांचेही हार्दिक अभिनंदन. सर्व सहभागी अनुदिनीलेखकांचेही सहर्ष कौतुक. कारण आपण सर्वच, या नव्या युगातील अनुभवलेखनाचे आधारस्तंभ आहात!

या प्रयासात सहभाग न घेतलेल्याही असंख्य मराठी अनुदिन्या, जीवनाच्या अगणित पैलूंवर दररोज अपार लेखन प्रकाशित करत आहेत. त्याही वाचून, आपापले नीरक्षीरविवेक जागृत करावे, क्षीरसंचय करून आपापले जीवन समृद्ध करावे, अशी उमेद पारंपारिक वाचकांस निर्माण झाली तर हा प्रयास खरोखर सार्थ ठरेल.
.