20140707

दुःखाचे स्वरूप

घर छोड के चले थे, खुशी की तलाश में, खुशी की तलाश में,
गम राह में खडे थे, वहीं साथ हो लिये,
यूँ हसरतों के दाग मोहोब्बत में धो लिये
खुद दिल से दिल की बात कहीं, और रो लिये

अशाप्रकारे सुखाच्या शोधार्थ घराबाहेर पडलेल्यांच्या वाटेवरच उभी असणारी दुःखे, त्यांची सोबत करू लागतात. मग स्वतःलाच त्या दुःखाचा सल सांगून रडून घ्यायची पाळी येते. त्यामुळे दुःख म्हणजे काय हे कुणालाही सांगावे लागत नाही. जन्म घेणारी बालके तर दुःख सहन न होऊन रडत रडतच ह्या जगात अवतीर्ण होत असतात.

विख्यात फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्युगो ह्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे ’ला मिझरेबल्स’. मराठीत भा.रा.भागवतांनी तिचा सुरेख अनुवादही केलेला आहे ’दुःख पर्वताएवढे’. त्या कादंबरीतील व्यक्तीरेखा एकापेक्षा एक अधिक दुःख सोसणार्‍या असतात. त्यांच्या दुःखांपुढे आपल्याला आपली दुःखे कःपदार्थ वाटू लागतात. मात्र त्यांच्या दुःखातील अनुभूती आपलीच आहे की काय, असे क्षणभर वाटून वाचक आपली नाळ त्या कादंबरीशी जोडून घेतो. ती कादंबरी अशा रीतीनेच विश्वविख्यात झालेली आहे.

दुःखे केवळ शारीरिकच असतात असे नव्हे तर दुःखे मानसिकही असतात. एम.जी.रामचंद्रन निवर्तले ही बातमी ऐकूनच काही लोकांना इतके अपार दुःख झाले की त्यांनी साक्षात मृत्यूलाही जवळ केले. पराभवाच्या भीतीने आत्महत्या करणारा विख्यात हुकूमशहा हिटलर तर सर्वश्रुतच आहे. मात्र अशा दुःखांची जातकुळी मानसिकच असते.

शारीरिक दुःखेही पराकोटीची असू शकतात. एवढी की त्यापेक्षा ते दुःखित, मृत्यूही आनंदाने पत्करतात. ८०-९० टक्के भाजल्याने होरपळलेले लोक, जेव्हा त्यातच जातात, तेव्हा नातेवाईकही सुटकेचा निश्वास टाकतात. कारण त्या होरपळलेल्यांचे दुःख केवळ त्यांनाच जाळत नसते, तर नातेवाईकांनाही ते असह्य होऊन जात असते.

आपलीच अनेक दुःखे, अनेकदा तुल्यबल राहत नाहीत. जेव्हा दात दुखत असतो, तेव्हा असे वाटते की ह्या जगात दातदुखीसारखी दुखीच नाही. पोट दुखणारेही ह्याच मताचे असतात. अर्धशिशीने डोके दुखणारेही असेच मत व्यक्त करतात. अस्थिभंगाच्या प्रकरणांत तर ठणका सहन न झाल्याने विव्हळणारे आपल्या दुःखाचे वर्णनही करण्यास असमर्थ ठरतात. म्हणून एक असे कुतुहल निर्माण होते की दुःखाचे खरे स्वरूप असते तरी कसे?

मला नागीण झाली, तेव्हा ही सारीच दुःखे मला क्षुल्लक भासू लागली. नागीण ह्या आजारात चेतातंतूदाह होऊन दुःखाची निर्मिती होते. चेतातंतूच्या मार्गावर, कोरडेपणा, तडतड, जळजळ, आग अशा संमिश्र भावना जाणवू लागतात. जळीताच्या प्रकरणासारख्याच, लालसर, पुळ्या उमटू लागतात. त्या वाढत वाढत परस्परांस भेटतात. फुटतात. खूप आग होते. यथावकाश (सुमारे एक ते दोन सप्ताहांतच) खपल्या पडून पुळ्या बर्याा होऊ लागतात. मात्र त्रास कमी होतच नाही. पुळ्या ही केवळ मूळ त्रासाची अभिव्यक्ती असते. ह्या आजारात, बाह्य लक्षणे ही, मूळ त्रासाची केवळ अभिव्यक्ती असतात. दुःखानुनयी असतात. लक्षणे ही दुःखपर्यवसायी असण्याची आपली सवय मात्र, लक्षणे बरी होताच दुःख कमी होण्याची अपेक्षा करू लागते. अशा प्रकारच्या विपरित करणीचे, अनेक महिने टिकून राहणारे, अपार दुःख, नागीण अनुभवास आणते.

गौतम बुद्धाला जेव्हा दुःखाचे स्वरूप लक्षात आले, तेव्हा तो सर्वसंगपरित्याग करून दुःखाचे मूळ शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मग बोधी वृक्षाखाली त्याला जो बोध झाला तोच बुद्ध धर्म!

त्या धर्माचे सार सांगायचे तर:
सुख हैं इक छाव ढलती, आती हैं जाती हैं, दुःख तो अपना साथी हैं
मग एकदा का दुःखाला आपले मानले की, उरते काय तर सुखच सुख!

’जगाच्या पाठीवर’ सिनेमात तर, जगात दुःख आणि सुखाचे प्रमाण शंभरास एक असल्याचे गजानन दिगंबर माडगुळकरांनी लिहूनच ठेवलेले आहे. ते म्हणतातः

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

आपल्या कार्यकर्तृत्वाने जगातील दुःख नाहीसे करण्याचा शर्थीने आटापिटा करणारी माणसे, किमान आपल्या व आपल्या आप्तेष्ठांच्या जीवनातील दुःख नाहीसे करण्यात यश मिळवतात. मग जग सोडून जातांना त्यांना दुःख होत नाही. समाधानाने कृतकृत्य होऊन ते परलोकाच्या वाटेवर मार्ग चालू लागतात. योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांच्या मृत्यूसमयी, ’धन्योऽहं’ (मी धन्य झालो!) म्हणतच त्यांनी वयोवृद्ध अवस्थेत देह ठेवला.

तर मग दुःखाचे खरे स्वरूप काय आहे? जन्मतः निर्माण होते ते दुःख. कर्तृत्वाने नाहीसे करता येते ते दुःख. जे मानवी जीवनाला स्वनिरसनाचे उद्दिष्टच पुरवते ते दुःख. की धर्मनिर्मितीचे मूळ म्हणजे दुःख!

20140512

पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचेमूळ इंग्रजीत प्रकाशित झालेल्या, ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाचा, श्री.नरेंद्र गोळे ह्यांनी केलेला, ’आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’, हा मराठी अनुवाद १०-०५-२०१४ रोजी पुण्यात प्रकाशित झाला. हे पुस्तक माधवी-प्रकाशन-पुणे येथे, खालील पत्त्यावर विक्रीस उपलब्ध आहे.

चंद्रशेखर जोशी
दत्तकुटी, १४१६ सदाशिवपेठ, पुणे ४११०३०
दूरध्वनीः २४४७४७६२, २४४७५३७२,
भ्रमणध्वनीः ९३२५०९७८९४
ई-मेलः madhavipublisher@gmail.com
किंमत रु.२२५/- फक्त.
पृष्ठसंख्याः २०६.

’खो रहा चैनो अमन, मुष्किलों में है वतन
सरफरोशी की शमा, दिल में जला लो यारों
जिंदगी मौत ना बन जाए, सम्हालो यारों’

ह्या सरफरोश सिनेमातील शीर्षकगीतात व्यक्त केलेल्या परिस्थितीचा हा काळ आहे. देशातील खुशाली आणि शांतता भंग होत असण्याचा हा काळ आहे. कोणकोणते धोके ह्या काळाच्या उदरात दडलेले आहेत? ते प्रत्येक सुजाण नागरिकाने समजून घेण्याची आवश्यकता आहे. मात्र ती माहिती सहजी उपलब्ध असणारी नाही. ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांनी ह्या पुस्तकाच्या रूपाने ती समोर आणली आहे.

दुसर्‍या महायुद्धांतील जेत्यांनी जर्मनीस विभाजित केले. बर्लीन शहरात भिंत बांधून वैमनस्याची बीजे रोविली. पण सुजाण जर्मन नागरिकांनी एकजुटीने जर्मन राष्ट्रास एकसंध केले. बर्लिनची भिंत तर आता केवळ नामशेषच होऊन राहिली आहे. जर्मनीप्रमाणेच भारत-पाकिस्तान विलीनीकरण होऊन काश्मीरबाबतच्या सर्व समस्या समूळ नष्ट होतील तो सुदिन मानावा लागेल! सध्यातरी, १६ मेला उदयमान होणारी नवी राजसत्ता, ’उँची राजनीती’ करून, हे साध्य करेल अशी आपण आशा करू या. मात्र तोपर्यंत, किमान काश्मीरची समस्या काय आहे? हे जाणून घेण्याचा सोपा सोपान म्हणजेच, ’आव्हान जम्मू आणि काश्मीर मधील छुप्या युद्धाचे’ हे पुस्तक आहे.

जर्मनीच्या एकीकरणासारखे अद्वितीय उदाहरण जगभरात झालेले नाही असे मानले जाते. मात्र हे खरे नाही. भारतातच असे एक देदिप्यमान उदाहरण विद्यमान आहे. मात्र ते म्हणावे तितक्या ठळकपणे लोकांच्या नजरेसमोर आणले गेलेले नाही. १९७५ पर्यंत सिक्कीम हा एक स्वतंत्र देश होता. तो १९७५ साली भारताचे २२ वे राज्य म्हणून भारतात विलीन झाला. आज त्याबद्दल पूर्वाश्रमीच्या सिक्कीमवासीयांना, भारतवासीयांना, वा जगातील इतर कुणालाही, खंत वाटत नाही. दुधात साखर मिसळून जावी तसे, सिक्कीम भारतात विलीन होऊन गेले आहे. सिक्कीमला पर्यटन करून आपण तिथल्या निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आस्वादही घेत असतो. उदयमान राजसत्तेने अशाच पद्धतीने, अखंड भारताचे चित्र पुनर्स्थापित करावे अशी आपण आशा करू या. मात्र त्यानंतरच्या भारतीय उपखंडाचे भवितव्य स्थिरपद शांततेचे आणि समृद्धतेचे व्हावे, ह्याकरता ह्या पुस्तकातील काश्मीरच्या साद्यंत इतिहासावे विवेचन वाचणे जरूर आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या इतिहासाचे अनोखे तपशील देणारा मजकूर, राज्याच्या भौगोलिक सीमांचे यथार्थ दर्शन करविणारे सुरेख मुखपृष्ठ आणि राज्याच्या वर्तमान परिस्थितीचा जणू भावार्थप्रदीप शोभेल असा आढावा, ह्यांनी हे पुस्तक सजलेले आहे.

भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू आणि काश्मीर हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. इंग्रजांनी त्यास स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मुस्लिमबहुल लोकसंख्येचे आधारे, पाकिस्तान त्याचेवर पाकिस्तानात विलीन होण्याकरता दबाव टाकत होता. भारत नेहमीप्रमाणे तटस्थ होता. जम्मू आणि काश्मीरचे महाराजा हरिसिंह स्वतंत्र राहू चाहत होते. मात्र अशक्त, दुर्बळ राष्ट्रे दीर्घकाळ स्वतंत्र राहू शकत नाहीत. स्वातंत्र्य मिळवू पाहणार्‍या त्या राज्यांतर्गत शक्तींना हाताशी धरून पाकिस्तानने अप्रत्यक्षरीत्या त्या राज्यावर हल्ला चढविला. काही कळायच्या आतच, राज्याच्या मोठ्याशा भूभागावर पाकिस्तानने आपली सत्ता प्रस्थापित केली. महाराजा हरिसिंह ह्यांना भारताची मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. त्याकरता, नेहरूंनी जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन करावे अशी अट घातली. महाराजा हरिसिंह ह्यांनी हा निर्णय घेण्यास लावलेल्या अक्षम्य विलंबाचे पर्यवसान, आपण आज पाकव्याप्त काश्मीरच्या स्वरूपात पाहतो आहोत. हा सर्व उत्कंठावर्धक इतिहास ह्या पुस्तकात तपशीलाने दिलेला आहे.

जम्मू आणि काश्मीर राज्याचे भारतात झालेले विलीनीकरण, सोबत अनेक समस्या घेऊनच झाले. घटनेचे ३७० कलम, पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तानने चीनला दिलेला भारतीय भूभाग आणि चीनच्या ताब्यात असणारा आकाशी चीन, मुस्लिमबहुल प्रांतातील हिंदू अल्पसंख्यांकांचे प्रश्न, घूसखोर-निर्वासित आणि विस्थापितांच्या समस्या, ह्या त्या समस्यांपैकीच काही आहेत. ह्या समस्यांच्या निरसनार्थ भारतीय संघराज्याची संसाधने मग सततच खर्च होत राहिली. काश्मीरातील लोकांच्या समस्यांकरता भारतीय संघराज्याचा पैसा प्रमाणाबाहेर खर्च होऊ लागला. उत्तरप्रदेश, बिहारसारख्या बिमारू राज्यांनाही कधी मिळाली नाहीत, एवढी संसाधने काश्मीरावर खर्ची पडू लागली. जिथे जाऊन राहू शकत नाही, जिथली जमीन खरीदू शकत नाही, त्या राज्यास, इतर राज्यांनी मदत तरी किती करायची! हा आर्थिक असमतोलाचा प्रश्न मग उपस्थित झाला. ह्या आर्थिक प्रश्नाची सम्यक ओळख ब्रिगेडिअरसाहेबांनी ह्या पुस्तकात व्यवस्थित करून दिलेली आहे. त्याकरताही हे पुस्तक वाचनीय आहे.

हे पुस्तक सर्व वाचनालयांना संदर्भ-साधन म्हणून उपयुक्त ठरू शकेल असेच आहे. भारतातील अतिरेकाचा इतिहास समजून घेणार्‍या अभ्यासकांना, काश्मीरबाबतचा इतिहास माहित करू पाहणार्‍या विद्यार्थ्यांना, तसेच सर्वच राष्ट्रभक्तांना आणि ह्या बाबतीतील राष्ट्रीय नियोजनाकरताची मूलतत्त्वे जाणू पाहणार्‍या निर्णयकर्त्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. इथे ह्याची नोंद करणे आवश्यक आहे की, मूळ इंग्रजीतील ह्या पुस्तकाची निर्मिती, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत राज्यकर्त्यांच्या प्रबोधनाकरताचा दस्त-ऐवज म्हणून करण्यात आली असल्याने, तसेच लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून लिहिलेले असल्याने, हे पुस्तक अत्यंत मोलाचे ठरणार आहे.

अशीच समाज-प्रबोधक आणि शासनास ज्ञानदीप ठरावीत अशी, निरनिराळ्या विषयांवरची पुस्तके निरंतर लिहिली जावीत, अशी सदिच्छा मी ह्या निमित्ताने व्यक्त करतो.

20140506

आव्हान जम्मू आणि काश्मीरातील छुप्या युद्धाचे

आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील,  पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक  १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!

- नरेंद्र गोळे २०१४०५०६

20140416

सर्वात मोठा प्रज्ञाशोध

भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध - बिगेस्ट टॅलँट हंट’ असल्याचे सूचित करणारी एक जाहिरात दूरदर्शनच्या कुठल्याशा वाहिनीवर परवा पाहण्यात आली आणि विचारांचे एक मोठेच आवर्त मनात घोंगावू लागले. खरंच हा शोध आहे तसाच! म्हणूनच तो तशा प्रकारे लक्षात आणून देणार्‍या जाहिरात-संहिता-लेखकाचे (कॉपी-रायटरचे) मनःपूर्वक आभारच मानायला हवेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, प्रज्ञावंत उमेदवारांना, त्यांच्या मतप्रणालीचे समर्थन करणार्‍या पक्षांना, त्यांना मते देणार्‍या मतदारांना आणि एकूणच निवडणूक यंत्रणेला हा प्रज्ञाशोध असल्याची जाणीवच नसल्याचे दिसून येते. ह्याबाबत प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे.

भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे खरोखरीच जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध’ आहे. उत्तमोत्तम प्रज्ञावंतांनी त्याकरता उमेदवारी करावी. लोकमताने निवड करवून, उत्तमांतील उत्तम उमेदवारांचा शोध घेतला जावा. त्यांनी परस्पर विनिमय करून, सर्वोत्तम उमेदवारास पंतप्रधानपदी नियुक्त करावे. ह्याकरताच खरे तर आपली निवडणूक प्रणाली अभिकल्पित आहे. तिचे वर्तमानातील दर्शन मात्र तशा स्वरूपात होत नाही. जर झाले, होऊ शकले, तर ती आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडून ह्या प्रज्ञाशोधास सार्थ ठरवेल ह्यात मुळीच संशय नाही.

शालेय प्रज्ञाशोध (स्कॉलरशिप) परीक्षांच्या माध्यमांतून मला पहिल्यांदा ’प्रज्ञाशोध’ शब्दाचा अर्थबोध झाला होता. ह्या संदर्भात मला, मी दिलेल्या, घेतलेल्या, असंख्य परीक्षांच्या आठवणी दाटून आल्या. पात्रतेचे निकष आठवू लागले. प्रज्ञेस धार चढवण्याकरताचे तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानादी[१] नियम आठवू लागले. मुळात प्रज्ञावंत असलेली मुले, हरप्रयत्ने अभ्यास करून परीक्षांची जय्यत तयारी करत असल्याचे प्रसंग आठवू लागले. कसोटीचे दगड ठरणारे, मौखिक परीक्षा घेणारे परीक्षक आठवू लागले.

निवडणूकांच्या ह्या हल्लीच्या आन्हिकांत मात्र ही एवंगुणविशिष्ट ’प्रज्ञा’च हरवलेली दिसून येत असते. खरे प्रज्ञावंत निवडणुकांत का उमेदवारी करत नाहीत? का ते आपल्या विशिष्ट प्रज्ञेची जाहिरात करत नाहीत? का ते आपले ते विशेष सामर्थ्य जनमानसाच्या लक्षात आणून देत नाहीत? का लोकही त्या सामर्थ्यांवरच लक्ष केंद्रित करत नाहीत? वर्तमान निवडणुकांच्या संदर्भात, ह्या सगळ्याचा घेतलेला हा शोध आहे.

प्रज्ञाशोधांची कारणमिमांसा

सामान्यतः प्रज्ञाशोध करण्याचा उद्देश निश्चित केला जातो. प्रज्ञाशोधाचा उद्देश देशाचे नेतृत्व करण्यास पात्र विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे, संसाधने उपलब्ध करवून देण्याचे असते. प्रज्ञाशोधाकरता उमेदवारी करणार्‍या प्रज्ञावंतांना त्यात उमेदवारी करावी असे वाटावे म्हणून योग्य ते प्रलोभन पुढे केले जाते. ते प्रलोभन म्हणजे शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप). प्रलोभनार्थ उद्युक्त होऊन उमेदवार तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधानादी प्रयत्नांनी सिद्ध होतात. परीक्षेने ती सिद्धता तपासून पाहिली जाते. अधिक संपन्न उमेदवारास शिष्यवृत्ती देऊन त्याचा गौरव केला जातो. मात्र, शिष्यवृत्ती देणे हा काही प्रज्ञाशोधाचा उद्देश असू शकत नाही. शिष्यवृत्ती हे केवळ प्रलोभनच असते.

निवडणुकांच्या प्रज्ञाशोधाचा उद्देश स्पष्ट आणि घोषित असाच आहे. देशाचे सरकार नियुक्त करणे हा. प्रलोभन मात्र स्पष्ट आणि घोषित नसते. ते तसे करता आले तर अधिक प्रमाणात, सत्पात्र प्रज्ञावंत, उमेदवारीस तयार होतील. समाजात मान-सन्मान मिळतो, मोठ्या लोकसंख्येचे अधिकृतपणे नेतृत्व करता येते, निवडून आल्यास पदाचा वापर, गैर-वापर करून स्वार्थाकरता संसाधनांचाच अपहार करता येतो, प्रजेवर राज्य करत असल्याचे समाधान प्राप्त होऊ शकते इत्यादी अस्पष्ट आणि अघोषित प्रलोभने असतात. त्यांचे प्रदान निश्चित स्वरूपाने होईलच ह्याची शाश्वती नसते. संविधानानुसार अधिकृत उपायांनी, अधिकृत संसाधने उपलब्ध करवून देण्याची, शाश्वती मिळू शकल्यास, सत्पात्र प्रज्ञावंत उमेदवारीस तयार होतील.

उमेदवारीची पात्रता, उद्‌घोष आणि प्रचार

देशाचे सरकार चालविण्याकरता, देशासमोरची आव्हाने, प्रश्न आणि समस्या काय आहेत ह्याची माहिती असायला हवी. देशाचा इतिहास, भूगोल, नागरिकत्व इत्यादींचे किमान ज्ञान असायला हवे. प्रचलित निकडींच्या विषयांवर उमेदवाराने आपली मते तयार केलेली असावीत. हा झाला उमेदवारांच्या पात्रतेचा भाग. देशधोरणांबाबतची त्याची मते मतदारांना ज्ञात व्हावीत म्हणून त्यांचा उद्‌घोष आणि प्रचारही समर्थपणे केला जावा. उमेदवारांच्या मतमतांतरांतील भेद मतदात्यांच्या नीट लक्षात यावेत म्हणून, जाहिरीत्या देशधोरणांबाबतचे परिसंवाद भरवून त्यात उमेदवारांना आपापली मते विषद करण्याची अधिकृत संधी दिली जावी.
एकदा का निवडणूक हा पात्रतेचा निकष नक्की केला की, मग प्रत्येक निवडणुकीच्या उमेदवारीकरताही निम्नस्तरीय निवडणूकांतील यशस्वीताच पात्रता ठरवेल. म्हणजे खासदारपदाकरता उमेदवार कोण ठरू शकतील ह्याची पात्रता म्हणजे, किमान एकदा तरी तो उमेदवार आमदार राहिलेला असावा. आमदार म्हणून निवडून द्यावयाचा उमेदवार किमान एकदा तरी पंचायतीत पंच, सरपंच म्हणून किंवा नगरपालिकांच्या निवडणुकांत नगरसेवक म्हणून निवडून आलेला असावा. ह्यामुळे किमान पात्रता निश्चित होऊन सहज म्हणून कोणीही, काहीही अनुभव नसतांना, उमेदवारी करू शकणार नाही. अचानक पंतप्रधान होऊ पाहणार्‍यांनाही आपसूकच चाप लागेल.

प्रचारातील मुद्दे, घोषित मते आणि अपप्रचार-निषेध

देशापुढील कळीच्या आव्हानांची, समस्यांची आणि प्रश्नांची एक यादीच सरकारने प्रकाशित ठेवावी. प्रत्येक उमेदवाराने व पक्षांनी त्यांबाबतची आपापली मते आणि धोरणेही उमेदवारीसोबतच घोषित करावीत. ह्या घोषणापत्रांचा अधिकृत अहवाल निवडणूक आयोगाने बाळगावा. निवडून आल्यानंतरच्या काळात उमेदवाराने वा पक्षाने त्याविपरित भूमिका घेतल्यास, त्यास ती तशी घेता येऊ नये. घ्यायची झाल्यास, तशा भूमिकेस वैधता प्राप्त करवून घेण्याबाबत कठोर कायदे असावेत.

प्रचारात ह्याव्यतिरिक्तचे मुद्दे उपस्थित करतांना उमेदवार व्यक्तींच्या नावावरून, खासगी आयुष्यांतील विवक्षित घटनांवरून, किंवा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेवरून टीका करू नये. कारण निकष निवडणूकांत निवडून येणे हाच असणार आहे. इतिहासात तो उमेदवार कुठल्याही लोकप्रतिनिधित्वाच्या पदावर पदासिन असल्यास त्याने घेतलेल्या निर्णयांच्या उचितानुचिततेबाबतच चर्चा व्हावी. उमेदवारानेच आपण असे कोणकोणते निर्णय घेतले, त्यातले कोणते लोकोपयोगी ठरले आणि कोणते फारसे उपयोगी ठरू शकले नाहीत ह्यांची जाहीर चर्चा करावी. इतर उमेदवारांनी, पक्षांनी किंवा मतदारांनीही त्याबाबतचे मतभेद जाहीर करावेत.

लोकमानसातील प्रज्ञाशोधाबाबतची स्पष्टता

निवडणूका हा प्रज्ञाशोध आहे. समाजातील यच्चयावत प्रज्ञावंतांना उमेदवारीस प्रोत्साहित करणेच अंतिमतः समाजहिताचे आहे. निवडणुकांतील निवड हेच पात्रतेचे निकष असणार आहेत. निवडून दिलेल्या व्यक्तींना, लोकप्रतिनिधींना किमान सहकार्य आणि सन्मान देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इत्यादी गोष्टीही लोकांना पटवून देण्याची आवश्यकता आहे.

असे झाल्यास हा सर्वात मोठा प्रज्ञाशोध खर्‍या अर्थाने फलद्रुप होऊ शकेल. आपल्याला खरेखुरे समर्थ सरकार लाभू शकेल आणि आपला देश खर्‍या अर्थाने सुशासित होऊ शकेल. असे होवो हीच सदिच्छा!
[१] भारतीय अष्टांग योग संहितेत; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही स्वकर्मांवर एकाग्रता साधून मुक्ती मिळवण्याकरताची अंगे म्हणून सांगितली गेलेली आहेत. यांपैकी सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे), अपरिग्रह (अनावश्यक गोष्टींचा साठा न करणे) व ब्रम्हचर्य (विकाराधीन नसतांनाची, शारीर-चर्या म्हणजे वर्तणूक) हे पाच यम (आयाम म्हणजे परिमिती, डायमेन्शन. आयाम, यमांच्या परिसीमा व्यक्त करत असतात, ह्या अर्थाने पाहिल्यास यम म्हणजे वर्तनपद्धती) आणि शौच (स्वच्छता), संतोष (समाधान), तप (कष्ट करून, हवे ते साध्य करण्याकरता केलेले अथक प्रयत्न), स्वध्याय (अभ्यास) व ईश्वरप्रणिधान (म्हणजे जे जे कर्म आपण करत असतो ते सर्वप्राणिमात्रांच्या हितकारक असावे ह्याकरता समर्पित करण्याची भावना राखणे) पाच नियम सांगितलेले आहेत. आसन म्हणजे मानवी शरीरास स्वस्थतेने दीर्घकाळ (सुमारे पाच सहा मिनिटे) एकाच अवस्थेत स्थिर राहता येईल अशी अवस्था. प्राणायाम म्हणजे श्वसनशक्ती वाढवण्याकरता, तसेच शरीराच्या स्वस्थतासाधनार्थ केलेले शासोच्छवासाचे नियमन. प्रत्याहार म्हणजे प्रत्यंचेस (धनुष्याच्या दोरीस) बाणासह ओढून घेऊन बाण सोडण्यास सिद्ध (तयार) राहावे, तशासारखी मनस्थिती सिद्ध करणे. धारणा म्हणजे ज्या विषयावर मन एकाग्र करण्याची इच्छा असेल त्या विषयाची निवड करणे. ध्यान म्हणजे म्हणजे त्या विषयाचे चिंतन. तसेच समाधी म्हणजे, त्या विषयावर एकाग्रता साधून त्याबाबतीत सर्वप्राणिमात्रांच्या हितकारक काय ठरू शकेल ह्याबाबत मनाचा झालेला निश्चय. निर्णय. ह्या आठही अंगांनी योगसाधना केल्यास मोक्ष (मुक्ती, सर्वप्राणिमात्रांचे हित) साधू शकेल; असे आपल्या पूर्वसुरींचा हजारो वर्षांचा मौखिक परंपरेने संकलित केलेला अनुभव सांगतो.

.